Attacked on Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती देखील जो बायडन यांनी दिली.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ट्रम्प आणि बायडन दोघेही निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. एका प्रचार रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर ही हल्ल्याची घटना घडली आहे. जो बायडन यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत म्हटलं की, अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला कोणतीही जागा नाही.
बायडन यांनी म्हटलं की, “सर्व यंत्रणांनी मला घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. मी ट्रम्प यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते आता डॉक्टरांकडे आहेत आणि सुरक्षित आहेत. अमेरिकेत अशा प्रकारच्याह हिंसक घटनांना स्थान नाही. आपल्या सर्व देशवासियांनी एकजूट राहण्याची हीच वेळ आहे. आम्ही देशात अशा घटना घडू देणार नाही. मी आमच्या गुप्तचर संस्थांचे आभार मानतो. रॅली कोणतीही अडचण न येता शांततेत पार पडायला हवी होती. अमेरिकेत अशा प्रकारचा हिंसाचार योग्य नाही. डोनाल्ड ट्रम्प सध्या पूर्णपणे सुरक्षित आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनिया येथे प्रचार रॅलीत सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. ट्रम्प यांच्या अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केली. सुरक्षारक्षकांना तातडीने ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवलं.
ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “ट्रम्प ठीक आहेत. स्थानिक डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. सिक्रेट सर्व्हिसने त्यांना सुरक्षित तिथून बाहेर काढलं त्याबद्दल त्यांचे आभार. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांना एकजूट दाखवली पाहिजे”