मुंबई:
Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक काही तासांवर आली आहे. शुक्रवारी (12 जुलै) ही निवडणूक होणार आहे. या 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर
विधान परिषद निवडणुकीत आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर दिली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. आमदार फोडण्यासाठी 4 ते 5 कोटींची ऑफर दिली जात आहे, असा आरोप पाटील यांनी ‘NDTV मराठी’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केला आहे. कुणाचे आमदार फुटणार हे उद्या समजेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
विधानपरिषदेच्या शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार रिंगणात नाही. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं भवितव्यही शुक्रवारी निश्चित होणार आहे. आपले तीन्ही उमेदवार विजयी होतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय.
हॉटेल पॉलिटिक्सचा जोर
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल पॉलिटिक्सचा जोर वाढला आहे. निवडणुकीत आमदारांची फुटाफूट टाळण्यासाठी भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलवर असणार आहे. शुक्रवारी विधानपरिषदेची निवडणूक आणि त्यानंतर लगेच काही तासांनी याचा निकाल लागेल. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे